By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 8 Feb 2026 Paper 2 Marathi, Question 128

Topic: Reading comprehension

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायांची निवड करा.
भारतात रेल्वेचं जितकं लोकांना आकर्षण आहे तितकं जगात कुणालाच नसेल. ड्रायव्हर हा कुठल्याही संस्थेत महत्त्वाचा भाग असतो. साधे आपण कुठे फिरायला गेलो तरी आपल्या गाडीच्या ड्रायव्हरला आपण अपार प्रेमानं सांभाळतो. इथे तर रेल्वेच्या इतक्या मोठ्या अजस्त्र पसाऱ्यात ड्रायव्हरचं महत्त्व आजही अबाधित आहे. पूर्वी अँग्लो-इंडियन लोक ड्रायव्हर असायचे. त्यावेळी कोळशाची इंजिनं असायची. तसली वाफेवर चालणारी इंजिनं आज कालबाह्य झाली, तरीही काही ठिकाणी रेल्वेची हौस म्हणून ती चालवली जातात. आज डिझेल/इलेक्ट्रिक यावर चालणारी नवीनवी इंजिनं आलेली आहेत. भारतीय रेल्वेचा प्रवास थक्क करणारा आहे. पृथ्वीच्या चोवीस प्रदक्षिणांइतके किलोमीटर आपली रेल्वे रोजच्या एका दिवसात धावत असते. ठाणे येथला पारसिकचा बोगदा 1916 साली बांधला. त्यावेळी नुकतीच रेल्वे रांगत होती. पण आता त्याच बोगद्यातून रोज असंख्य गाड्या ये-जा करतात. इंग्रजांनी बांधलेल्या अनेक स्टेशनापैकी व्हीटी स्टेशन हे एकमेव स्टेशन होतं ज्यावर पादचारी पूल नव्हता. किंबहुना, त्याची गरज वाटू नये अशीच त्याची रचना होती. जाता जाता इथे नमूद करतो, की व्हीटी स्टेशनचं जुनं नाव ज्या राणीच्या नावावर होतं, तिच्या घराण्यातून काही रक्कम दरसाल या स्टेशनच्या देखभालीसाठी यायची.
गाड्या सतत धावत असतात. एका निर्धारित गतीने धावताना समोर येणाऱ्या प्रत्येक घटनेला प्रतिसाद देत पुढे सरकावं लागतं. भोवताली रेल्वेचे रूळ आणि दगड असल्यामुळे ड्रायव्हर रूक्षच असतात असाच साधारण समज आहे. यात एकटेपणा हा त्यांच्या नशिबाने त्याला बहाल केलेला एक दुखरा सल आहे. निसर्गाच्या विरुद्ध वेळेत सतत घरापासून दूर राहणारा ड्रायव्हर माणसांत फार कमी रमतो, कारण भोवतालच्या लोकांच्या वेळेत तो घरात असतच नाही. दिवाळी, दसरा, कुठला सण, काळ, वेळ या कुठल्याच गणितात नसणारी अशी त्याची कामाची वेळ असते. मेल गाड्या साधारणपणे रात्रीच चालतात. त्यामुळे जेव्हा हा घरी असतो, तेव्हा सारं जग वेगळ्या दुनियेत असतं आणि हा मात्र मोठ्या कष्टाने स्वतःची झोप पूर्ण करत असतो. रेल्वेचा ट्रॅक हा भर वस्तीतून कधीच जात नाही, पण ट्रॅक आल्यावर मात्र त्याच्या भोवताली वस्ती इतकी गच्च होते, की ट्रॅक अगोदर की वस्ती यांच्या झगड्याला उगाचच सुरुवात होते. हळूहळू काळ बदलला. रेल्वेने कात टाकायला सुरुवात केली. तिचा पसारा वाढत असतानाच कमी श्रमाची डिझेल/इलेक्ट्रिक इंजिनं आली. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक होतं. साधारण 1980 नंतर प्रशिक्षितांची पलटण रेल्वेत यायला सुरुवात झाली. तोपर्यंत कुणीही ड्रायव्हर बनू शकायचा. ज्याला कुठेच नोकरी नसायची, त्याला रेल्वेत ड्रायव्हरची नोकरी चटकन मिळायची.

Q128

व्हीटी स्टेशनचे वैशिष्ट्य म्हणजे .......

  1. (1) तेथे पारसिकचा बोगदा आहे.
  2. (2) त्यावर पादचारी पूल नव्हता.Correct answer
  3. (3) तेथे गाडीचे ड्रायव्हर अँग्लोइंडियन असत.
  4. (4) तेथील रेल्वेचा ट्रॅक भरवस्तीत आहे.

Solution.

CBSE answer: (2)

उत्तर: (2) त्यावर पादचारी पूल नव्हता.

  1. उताऱ्यानुसार इंग्रजांनी बांधलेल्या स्टेशनांपैकी व्हीटी हे एकमेव स्टेशन होते ज्यावर पादचारी पूल नव्हता.
  2. त्याची रचनाच अशी होती की पुलाची गरज भासू नये.
  3. पारसिकचा बोगदा ठाणे येथे आहे; अँग्लो-इंडियन ड्रायव्हर ही सर्वसाधारण माहिती आहे; भरवस्तीतील ट्रॅक याचा व्हीटीशी संबंध नाही.