By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 8 Feb 2026 Paper 1 Marathi, Question 121

Topic: Vocabulary

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा :
माझ्या आईच्या घरातून जरी त्या भावविश्वाचा जन्म झालेला असला तरी त्याची बीजं रुजली होती ती माझ्या आजीच्या सदाशिव पेठेतल्या घरात! आम्ही आजीला ‘वहिनी’ म्हणत असू, तिचं घर म्हणजे माझा एक अस्सल बालमित्र! खूप जुना!! त्याच्या फोटोवरची धूळ झटकल्यावर त्याचा तो कृष्ण–धवल चेहरा आठवून मनापासून हसू येतं. त्या फोटोत मी असते, माझ्या आईचं माहेर असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या वयातलं माझं सर्वस्व असलेली माझी आजी असते. मी एक वर्षाची असल्यापासून जिच्या अंगाखांद्यावरच वाढले त्या माझ्या आजीचं ते छोटंसं घर म्हणजे त्या काळी माझ्यासाठी स्वर्ग का होता – हे आता मला माझी नातवंडं सांभाळताना रोज आठवतं. घराचं मोजमाप करायच्या पलीकडचं माझं ते वय होतं. आजी काही धनवान नव्हती पण खूप श्रीमंत होती मनाने. अत्यंत दिलदार अन् समृद्ध मन असलेल्या माझ्या आजीने त्या छोटुकल्या घराला एक असं व्यक्तिमत्त्व दिलं होतं की अजूनही त्या घराकडे पाहिलं तर खिडकीजवळच्या शिलाई मशीनवर आजी काहीतरी शिवत बसल्याचा भास होतो. अजूनही त्या घरासमोरून जाताना स्वादिष्ट मसालेभात आणि लोणकढी तुपातल्या मोहनथाळाचा सुवास दरवळून जातो. एखाद्या व्यक्तीचा चेहराच नव्हे तर संपूर्ण व्यक्तिमत्त्व परिधान केलेलं दुसरं घर माझ्या पहाण्यात नाही.
त्या घराने मला काय दिलं? तर मला हात दिले त्या घराने–दुसऱ्याला भरपूर देणारे! आणि दुसऱ्याच्या आनंदात आपलाही आनंद असतो हे शिकवणारं मनही दिलं! त्या घराला छोटं किंवा लहान म्हणायला मी धजावणार नाही कारण त्या छोट्याशा वास्तूपेक्षा खूप मोठं–विशाल मन तिथे राहत होतं. आजीची आर्थिक परिस्थिती मला आठवायचीच नाहीये कारण तिच्यासमोर अनंत अडचणी–आव्हानं असताना देखील मला तिने एखाद्या राजकन्येसारखं वाढवलं होतं! माझ्या त्या चिमुकल्या वयात माझ्या सर्व हट्टांचे पर्याय, प्रश्नांची उत्तरं आणि आनंदाचा ठेवा म्हणजे माझी आजी–वहिनी होती.
दुसऱ्याच्या गुणांवर प्रेम करण्यात मग्न असलेलं ते घर अनेकदा विसरून जात असे की आपल्या चांगुलपणाचा कितीतरी जण गैरफायदा घेत आहेत. त्या मग्नतेत घर हे देखील विसरून गेलं होतं की ते सर्वांपेक्षा जास्त गुणवान आहे. स्वतःमधला ‘राजहंस’ पाहायला देखील थोडीशी उसंत मिळावी लागते ना! – ती त्या घराला कधी मिळालीच नाही. बिचारं कित्येक वर्षं बदकाचं आयुष्य जगलं!

Q121

‘रुजणे’ या शब्दाच्या आशयाचा चुकीचा पर्याय कोणता ?

  1. (1) जगणे
  2. (2) उगवणे
  3. (3) रुतणेCorrect answer
  4. (4) लागणे

Solution.

CBSE answer: (3)

उत्तर: (3) रुतणे

  1. ‘रुजणे’ म्हणजे बी अंकुरणे, रोपाने मूळ धरणे आणि लाक्षणिक अर्थाने एखादी गोष्ट मनात पक्की बसणे.
  2. बी रुजते म्हणजे उगवते (2); रोप रुजले म्हणजे ते लागले (4) आणि जगले (1). हे तिन्ही शब्द रुजण्याच्या आशयाशी जुळतात.
  3. ‘रुतणे’ म्हणजे काटा किंवा चाक चिखलात आत घुसणे, अडकणे. यात मूळ धरण्याचा अर्थ नाही.

सावधान: ‘रु’ हा आवाज सारखा आहे म्हणून रुतणे समानार्थी वाटतो; पण आवाज सारखा म्हणजे अर्थ सारखा नव्हे.