By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 14 Dec 2024 Paper 2 Marathi, Question 97

Topic: Grammar

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
श्रावण वाघ नुकताच वयात यायला लागला होता. त्याच्या बाजूला दुसऱ्या पिंजऱ्यात एक वाघीण होती. ती वाघीण माजावर आली आणि ती श्रावणच्या पिंजऱ्याजवळ गेली. वाघिणीचं असं वागणं त्याला समजलं नाही. त्याला तिचा राग आला आणि काही कळायच्या आतच त्यानं तिची शेपटी जोरात पकडून तोडून टाकली. त्यांच्या आवाजांनी प्राणीसंग्रहालय भयचकीत झालं. दुसऱ्या दिवशी त्याची बातमी झाली. मी त्यावेळी हत्तींच्या अभ्यासाबरोबर पूर्णवेळ पत्रकारिता करत होतो. घडलेला प्रकार अंगावर काटा आणणारा असला तरीसुद्धा ज्या धीरानं तिथल्या सगळ्यांनी त्या दिवशी काम केलं त्याला तोड नव्हती. डॉक्टरांनी वाघिणीला उपचाराकरता ताबडतोब दुसऱ्या पिंजऱ्यात हलवलं. दुर्दैवानं तिचीही शेपटी कापायला लागली आणि मला पुन्हा बांडी आठवली. एरवी श्रावण खरोखरच चांगला वाघ होता. अगदी गुणी बाळ! पण त्याच्या अशा वागण्यानं सगळे चकित झाले. तिथल्या डॉक्टरांनी मला विचारलं, “अरे तू हत्तींशी बोलतोस. मग आमच्या श्रावणला शांत व्हायला मदत करशील का?” मी म्हणालो, “अहो, आमचा हत्ती शाकाहारी आहे!” पण डॉक्टरांचा माझ्यावर विश्वास होता. जसा एखादा कसलेला शिक्षक आपला विद्यार्थी किती पाण्यात आहे हे सहज ओळखतो तसं त्यांनी कदाचित मला ओळखलं होतं. माझा हत्तींचा अभ्यास चालू असताना त्रिवेंद्रम प्राणीसंग्रहालयातल्या ऐश्वर्या सिंहिणीला पिल्लू झालं होतं आणि तिनं ते कुणाला दिसू नये अशा पद्धतीनं लपवून ठेवलं होतं. तिनं पिल्लू दाखवावं म्हणून डॉ. जेकब यांच्या अनुपस्थितीत तेव्हाच्या संचालकांनी माझी मदत घेतली होती. जेव्हा मी पूर्णवेळ हत्तींसंबंधी काम करण्यासाठी नोकरी सोडली, तेव्हा डॉक्टरांनी मला प्राणीसंग्रहालयात इंटर्नशिप करण्याबाबत मार्गदर्शन केलं. माझा हत्तींवरचा रीसर्च पेपर प्रसिद्ध झाल्यामुळे प्राणीसंग्रहालयाचे संचालक के. गंगाधरन यांनी मला ‘नेक्स्ट लेव्हल कम्युनिकेशन’ साठी इंटर्नशिप दिली. आता मी एकाच श्रावणबरोबर नाही, तर सात वाघांबरोबर काम करणार होतो. जोडीला नऊ बिबटे आणि पाच सिंहसुद्धा होते. त्यातला श्रावण आणि जॉर्ज या दोन वाघांबरोबरचा अभ्यास जास्त महत्त्वाचा होता. त्या संपूर्ण काळात वाघांची मानसिकता, संभाषणाचे प्रकार, घडणाऱ्या घटनांना त्यांची येणारी प्रतिक्रिया, अशा सगळ्या बाजूंनी अभ्यास करायचा होता. माझे तासंतास आता वाघाच्या पिंजऱ्याबाहेर जायला लागले. त्यांच्या हालचाली टिपणं, रेकॉर्डिंग करणं, डॉक्टरांना वेळ मिळेल तेव्हा त्यांना ते रेकॉर्डिंग दाखवून त्यावर मार्गदर्शन घेणं, असा अभ्यास जोरात चालू होता. मी वाघांचे पिंजरे असलेल्या परिसरात गेल्यावर श्रावणचे हुंकार (मोठ्या आवाजातले) ऐकायला यायचे. तेच हुंकार इतर वाघांनी वापरायला सुरुवात केली त्या वेळी लक्षात आलं, की वाघांनी मला स्वीकारलं आहे. एके दिवशी दुपारी मी श्रावणच्या पिंजऱ्याबाहेर बसून लिखाण करत होतो. तेव्हा श्रावण जवळ येऊन पिंजऱ्याला अंग घासू लागला. नंतर पिंजऱ्याला अगदी चिकटून बसला. जणू काही त्याला मला टेकून बसायचं होतं. पिंजऱ्याच्या जाळीतून मी त्याला जेमतेम स्पर्श केला आणि मांजरीनं जसं वळून बघावं तसं त्यानं वळून बघितलं. त्याच्या वागण्यात कुठेही राग दिसत नव्हता. त्या देहबोलीमध्ये ‘अजून गोंजारून हवं आहे’ असं सांगणं होतं.

Q97

‘श्रावण वाघ’ हे कोणते नाम आहे?

  1. (1) भाववाचकनाम
  2. (2) विशेषनामCorrect answer
  3. (3) समुदायवाचकनाम
  4. (4) सामान्यनाम

Solution.

CBSE answer: (2)

उत्तर: (2) विशेषनाम

  1. 'श्रावण' हे एका विशिष्ट वाघाला दिलेले नाव आहे.
  2. एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, प्राण्याला किंवा स्थळाला दिलेले नाव विशेषनाम असते.
  3. 'वाघ' एकटा सामान्यनाम आहे, पण 'श्रावण वाघ' एकाच ठराविक वाघाचा निर्देश करतो.

सावधान: 'वाघ' शब्द पाहून सामान्यनाम निवडू नका.