By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 14 Dec 2024 Paper 2 Marathi, Question 126

Topic: Reading comprehension

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्याय निवडा.
छोटेसे घर, त्या भोवती दाटीवाटीने लावलेला बगीचा. त्यातील अनेकरंगी फुले आम्हाला वेड लावत. आजूबाजूचा परिसरही बंगले व बगीचा यांनी भरलेला. मग काय विचारायलाच नको! हवी तेवढी फुले उपलब्ध. श्रावणात तर लाखोली वाहण्यासाठी आम्ही मुले सकाळपासूनच त्या झाडाखाली. ज्यांचे व्रत असेल त्याला ती गोळा करून देणे, हे आमचे कामच! कोणाची मंगळागौर असो, की हरतालिका असो. आम्ही मैत्रिणी फुलझाडे धुंडाळत फिरत असू. गच्च भरलेली जास्वंदीची झाडे, त्यांची भरीव एकेरी लाल गुलाबी फुले, गोकर्णीची कानाच्या आकाराची पांढरी, निळी फुले.
मधूनच छोट्या वेलीला आलेली गणेश फुले, काय तोडू नी काय नको, असे होऊन जात असे. मंगळागौर कोण्या नव्या नवरीची, पण उत्साह आमचाच जास्त. पहिलटकरणीचे डोहाळजेवण व झुला सजवायलाही आम्ही मैत्रिणी हजर. पाने–फुले यांच्या महिरपीने झोका गच्च भरून सजविला जाई. हरतालिकेला धोतऱ्याची झाडे, रुईची जांभळी फुले आणण्यासाठी पानांची माळ लागे. झाडा–झुडपांतून ती पाने शोधावी लागत. तेही संशोधन आम्ही विनातक्रार कित्येकदा केले आहे.
शाळेत जाताना बुचाची फुले गोळा करावी, त्याची गुंफून वेणी करावी व लगेच केसात माळावी, हा नेहमीचाच उद्योग. बुचाचे झाड ताडासारखे उंच. त्यामुळे ती फुले तोडणे शक्यच नसायचे. म्हणून वाऱ्याच्या झोताबरोबरच फुले पडतील या आशेने अर्धा–अर्धा तास आम्ही झाडाखालीच घालवत असू. हे सारे महाविद्यालयात गेल्यावर तर कधीही फुलांशिवाय माझे पान हालत नसे. रोजच गजरा. कधी अबोली, कधी जाई–जुई, तर कधी मोगरा. अगदी जांभळी, पांढरी, सोनेरी, कोरांटीची फुलेसुद्धा माझ्या केसावर फुलून येई. दसरा–दिवाळीच्या वेळी तर बागा अनेक तऱ्हेच्या शेवंतीने बहरून यायच्या. हा मोसम म्हणजे फुलांची पर्वणीच! छोटी बट शेवंती, गोंडा शेवंती, सोनेरी, पांढरी, पिवळी, अगदी गर्द लाल शेवंतीही या ऋतुत फुलून यायची आणि हिरव्यागार बागेला झेंडूची सोनपिवळी किनार नजर लागावी इतकी सुंदर दिसत असे. या सणांच्या दिवसांत अंगणात रांगोळीदेखील फुलांचीच असे.
रात्री जेवणानंतर शतपावलीची सवय लागली ती फुलांच्या ओढीनेच. जिवाला वेड लावणारे ते रातराणी, मधुकामिनी, मधुमालती, जाई–जुईचा मादक वास मन धुंद करून टाकत. अन् अवचित ती सुगंधाची खाण शोधण्यासाठी मन सैरभैर होई. खरे तर रातराणीचा जीव किती लहान, अगदी नखाएवढा! पण, सारा आसमंत भारून टाकण्याचे सामर्थ्य त्या चिमुकल्या फुलांमध्ये एकवटलेले असते. रात्रीची शोभा वाढविणारे जाई–जुईचे, सायलीचे नाजूक घोस अंधारातही इतरांना जीव तोडून सुगंध देत असतात. निसर्गाने दिलेले दान इतरांना मुक्तपणे वाटत असतात. कधी कधी कुंपणावर विविधरंगी बोगनवेलेही विराजमान झालेल्या दिसत; पण मला मात्र ते कागदी फूल कधीच आवडले नाही.
मला फुले आवडतात – अगदी फळांचीसुद्धा. पेरूची पांढरी पारदर्शक फुले, डाळिंबाची केशरी फुले, वांग्याची जांभळी, तर भेंडीची काहीशी लालसर मोठी फुले मी मन लावून बघते. त्यातील अनोखे लावण्य भुरळ घालते. बालकवींनी नाही का अगदी क्षुद्र वाटणाऱ्या गवतफुलाला आपल्या कवितेने अजरामर करून टाकले.
सृष्टीचे सारे सौंदर्य परमेश्वराने फुलांत उधळले आहे. नाजूक रंगरूप, अनोखे आकार, सुवास या सर्वांचे लेणे लेवून फुले जन्माला येतात. अगदी परमेश्वराच्या अंगाखांद्यावर खेळण्याचे भाग्यही त्यांनाच लाभले; पण ही फुले मात्र क्षणभंगुरतेचा शाप घेऊन सृष्टीवर येतात व मानवाला त्याच्या जन्मापासून तर अगदी मृत्यूपर्यंत साथ देतात. झाडावरून तोडले जाताना तोडणाऱ्याची इच्छा पुरवितात. न तोडता झाडावरच काही फुले राहतात, ती बिचारी आपला कार्यकाल संपताच निमुटपणे मातीत मिसळून जातात. अशा फुलांच्या निकट राहण्याचे भाग्य आपल्याला मिळाले. आता नवीन पिढी संकुचित घरात, टीचभर जागेत हा आनंद मिळवू शकणार नाहीत.

Q126

लेखिकेला न आवडणारे फुल कोणते?

  1. (1) गोकर्णी
  2. (2) पांढरी कोरांटी
  3. (3) बोगनवेलCorrect answer
  4. (4) गुलबक्षी

Solution.

CBSE answer: (3)

उत्तर: (3) बोगनवेल

  1. कुंपणावरच्या विविधरंगी बोगनवेलीबद्दल लेखिका लिहिते, ‘मला मात्र ते कागदी फूल कधीच आवडले नाही.’
  2. गोकर्णी आणि कोरांटीची फुले तिने आवडीने गोळा केली किंवा माळली आहेत.
  3. गुलबक्षीचा उताऱ्यात उल्लेखच नाही.

सावधान: ‘पांढरी कोरांटी’ हा पर्याय रंगामुळे गोंधळ घालतो; कोरांटीची फुले लेखिकेने केसांत माळली आहेत.