By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 14 Dec 2024 Paper 1 Marathi, Question 128

Topic: Grammar

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा :
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका म्हणजे लेणींचे आगारच! कारण याच तालुक्यात दीडशेपेक्षा अधिक लेणी पाहायला मिळतात. त्या आजूबाजूच्या डोंगरांच्या पोटात खोदलेल्या दिसतात. यातली बहुतांश लेणी हिनयान या बौद्ध पंथाच्या आणि तिसऱ्या शतकातील असल्याचे इतिहासकारांचे मत आहे. असाच एक लेणीसमूह मानमोडी डोंगराच्या पोटात खोदलेला आहे. तसे पाहिले तर या मानमोडी डोंगरात तीन लेणी समूह आहेत. तीनही समूह अतिशय देखणे आहेत. त्यांची नावे आहेत–अंबा–अंबिका, भूतलेणी आणि भीमाशंकर लेणी. या लेणी म्हणजे मानवी कलात्मकतेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार.
पोल्ट्रीपासून चढण्यास सुरुवात केली की साधारण अर्ध्या तासात आपण अंबा–अंबिका, लेणींपाशी पोहोचतो. तिथे पोहोचण्याची वाट सोपी आहे तसेच काही ठिकाणी पायऱ्याही बांधलेल्या दिसतात. इतर दोन लेणींच्या तुलनेत या लेणी बऱ्यापैकी मोठ्या आहेत. त्यांच्या समोर भले मोठे पटांगण आहे. पटांगणामागे कातळातल्या भिंतीवर कोरलेला शिल्पखजिना आपल्याला अक्षरशः स्तंभिक करतो. या लेणींमध्ये सर्वप्रथम आढळते ती स्वच्छता आणि शांतता. मानमोडी डोंगराकडे फारच थोडे पर्यटक फिरकतात. मोजके अभ्यासक लेणी प्रेमी सोडले तर या लेणींत सामसूम असते. या लेणीसमूहात विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे अशा एकूण 33 लेणींचा समावेश आहे. पुरातत्त्व विभागाने त्यांना 18 ते 34 असे क्रमांक दिलेले आढळतात. (‘भीमाशंकर’ गटाच्या 17 लेणींनंतर पुढचे क्रमांक अंबा–अंबिका गटाला दिले आहेत). या लेणी बहुमजली असून उत्तरेकडे तोंड करून खोदलेल्या आहेत. बऱ्याच लेणींचे खोदकाम जमिनीलगत आहे. कातळावरच्या भागात लेणींकडे तोंड केले की आपल्या डाव्या हाताकडून किंवा पूर्वेकडून या लेणी पाहायला सुरुवात करायची. यातील 30 क्रमांकाची लेणी विशेष आहेत. जिन्याने वर गेलो की उजव्या बाजूला सलग पाच खोल्या दिसतात. चौथ्या खोलीत जैन शिल्पकाम दिसते. इतिहास अभ्यासकांच्या मते ही शिल्पे जैनांचे तीर्थंकर नेमिनाथ आणि जैन देवतेची आहेत. यातील अंबिंका देवी आंब्याच्या झाडाखाली बसलेली आहे. या देवीच्या नावावरूनच या गटाला अंबा–अंबिका असे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. पण काही इतिहासकार थेट महाभारतातील अंबा–अंबिका या पात्रांचे दाखले देतात, पण हे लेणे आहे मात्र बौद्धकालीनच. मुख्य चैत्यगृहाच्या भिंतींवर, गवाक्ष कमान, खांब या साऱ्यांवर दहा मोठे ब्राह्मी लिपीतील लेख कोरलेले होते असे अभ्यासक सांगतात. पण कालौघात आणि संवर्धनाच्या कामात आता फक्त आठच लेख शिल्लक आहेत. या साऱ्या लेखातून लेणींच्या निर्मितीबाबत तसेच दानधर्माबाबत माहिती मिळते. यानंतर काही विहार आणि पाण्याची टाकी लागतात.

Q128

एकवचन–अनेकवचनी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा :

  1. (1) खाते–खाती
  2. (2) खांब–खांबेCorrect answer
  3. (3) शिल्प–शिल्पे
  4. (4) कमान–कमानी

Solution.

CBSE answer: (2)

उत्तर: (2) खांब–खांबे

  1. ‘खांब’ हा अकारान्त पुल्लिंगी शब्द आहे. अशा शब्दांचे अनेकवचन बदलत नाही: एक खांब, अनेक खांब.
  2. खाते–खाती: एकारान्त नपुंसकलिंगी शब्दाचे अनेकवचन ईकारान्त होते, ही जोडी बरोबर.
  3. शिल्प–शिल्पे: नपुंसकलिंगी शब्द, अनेकवचन एकारान्त, बरोबर.
  4. कमान–कमानी: स्त्रीलिंगी शब्द, अनेकवचन ईकारान्त, बरोबर.

सावधान: ‘शिल्प–शिल्पे’प्रमाणे ‘खांब–खांबे’ बरोबर वाटू शकते, पण ‘खांब’ पुल्लिंगी असल्याने नियम वेगळा आहे.